<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. - मनपटलांवरच्या रेषा.. ३]]>Tue, 12 Jan 2016 18:43:18 -0800Weebly<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. ३]]>Sun, 22 Apr 2012 00:05:53 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2409/2किती..?
मनाचं फावल्या वेळेचं काम म्हणजे प्रश्न विचारात रहाणं ! जर ते प्रश्न सहज सापडत नसतील तर मनाच्या पोकळीत चौफेर एखाद्या भरकटलेल्या पक्ष्यासारखा प्रश शोधत रहाणं. प्रश्नही असे ज्यांची उत्तर शोधणं म्हणजे आपल्याच हाताने मनाच्या शांत पटलांवर शंकांचे खडे टाकत त्यात लहरी उठवणे. खरं तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजेच असे नाही. पण उत्तर मिळाले नाही तर एखादा डाव काही अंतराने हर्ल्यासारखी परिस्थिती होते. असेच काहीसे प्रश्न मला पडत रहातात आणि मी अजूनच गोंधळून जातो !

किती रेषांची
कितीक वळणे
आणिक चालणे
समांतर !

किती मेघांचे
कित्येक रंग
अतृप्त तरंग
मनामधे ..

किती हातांना
पाशवी बंधन
पहिले वंदन
मालकाला

किती जणांचे
इवले घरटे
नियती वाटे
वाहून गेले ..

किती प्रश्नांचे
उत्तर कळले
आणिक जुळले
एकमेका ?!

कित्येक किती
हे उभे ठाकले
सारेच वाकले
त्यांच्यापुढे !

पाणी ..?
अति परीचायामुळे अवज्ञेत गेलेली अजून एक वस्तू म्हणजे पाणी ... हे पाणी अनेक रूपांनी अनेक रंगांनी आपल्या समोर येते. प्राचीन पंडितांनी पाण्यासाठी अनंत नावे दिली. आज कालच्या युगात म्हणजे (आमच्या शाळेत) आम्ही त्याला रासायनिक नाव ही दिले. या पाण्याच्या विविध रूपांची मनाने मांडलेली एक गोळाबेरीज .. या गोळाबेरीज मध्ये ज्यांची बाकी शून्य झाली त्यांना आपण सज्ञान मानतो पण कधी कधी माझ्या मनाची ही गोळाबेरीज चुकते .. तेव्हा ?

मंत्रोच्चारले कोणी, तर अभिषेक धार होते
अस्तित्व काजळताना, त्याचे गटार होते

कोणी प्यायले तीर्थ इथे, नाक झाकले कोणी
तेच ते हे पाणी, तयांचे प्याले भरले कोणी

विरहाच्या वाटे धावले, बंध तोडून अंगणाचे
साठून साठून जाहले, शब्दही काही गाण्याचे

पडते कधी आभाळी, वाहते कधी पुरात
लालसेतही गळते, कधी निर्मळ त्या झऱ्यात

हे असते तरी ते काय, कोणी सांगाल का मला
अन जाणून सर्व काही, माणूस म्हणाल का मला ?


गणू आणि टक्क्यांचं गणित !
एका बाळबोध मनाने अत्यंत हुशार समाजकारणाचे मांडलेले गणित ..

पन्नास टक्यांच एक गणित
मास्तरांनी सोडवून दाखवलं
दाखवलं म्हणजे फळ्यावर उतरवून काढलं !

गणू उठून म्हणाला
"मास्तर उरलेले पन्नास टक्के का मोजायचे नाहीत ?"
मास्तर डोळे वटारून म्हणाले
अभ्यासक्रमात नाहीत असे प्रश्न विचारायचे नाहीत !

गणू चूप बसला
पण डोक्यात गणित चालूच राहिलं ,
पुढच्या इयत्तेचं
पुस्तकही चाळून पाहिलं

पण उत्तर काही मिळेना
गणू पुरता या गणितात फसला ,
आपल्याच विचारात चुकून
चुकीच्या सीटवर बसला

'ती' ने हटकलं ,बिचारा पाऊण तास उभाच राहिला
कोणतीही 'ती' त्याचा विचार करत नव्हती
सीट रिकामी झाली तरी
त्याची बसण्याची धडगत नव्हती

त्याला वाटलं

बस मध्येही गणित पन्नास टक्क्यांचच
तर बाहेर का नाही ?!
हा नियम इथे चालतो
तर बाहेर का नाही ?!

शाळेच्या बाकातही पन्नास टक्के असायला हवेत
मास्तरांच्या धाकातही पन्नास टक्के असायला हवेत ,

सकाळच्या गाण्यातही पन्नास टक्के हवेत
पावसाच्या पाण्यातही पन्नास टक्के असायला हवेत ,

पुस्तकाच्या धड्यात
शिक्षेच्या छड्यातही पन्नास टक्के हवेत ,

रहदारीच्या रस्त्यातही पन्नास टक्के का नकोत ?
गटाराच्या वस्त्यांतही पन्नास टक्के का नकोत ?

पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासावर पन्नास टक्के मिळायलाच पाहिजेत
शहरातून उरल्यासुरल्या श्वासावर पन्नास टक्के असायला पाहिजेत

मालकांमध्ये पन्नास टक्के हवेत, नोकरांमध्ये पन्नास टक्के हवेत
आजाऱ्यामध्ये पन्नास टक्के हवेत, डॉक्टरांमध्ये पन्नास टक्के हवेत ,

बाबांच्या पगारावर पन्नास टक्के हवेत
आपल्या घरावर पन्नास टक्के हवेत

किराणा दुकानात, मॉलमधल्या खरेदीत पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत
नोकरी मागून लाचार झालेल्यांच्या यादीत पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत
मालकापुढच्या लाचारीत
महागलेल्या बाजारीत
हमालांच्या पथारीत त्यांना पन्नास टक्के मिळालेच पाहिजेत

दुनियादारी रेसच्या घोड्यात पन्नास टक्के हवेत
दररोज बसणाऱ्या जोड्यात पन्नास टक्के हवेत

दरबारात फुकट भांडण्यात पन्नास टक्के हवेत
भुकेच्या झोपड्या मांडण्यात पन्नास टक्के हवेत
त्या पुन्हा पाडण्यातही पन्नास टक्के हवेत

लोकलच्या दाटीवाटीवर पन्नास टक्के असलेच पाहिजेत
एकनएक चौपाटीवर पन्नास टक्के असले पाहिजेत

खडी फोडणाऱ्या मजुरात पन्नास टक्के हवेत
त्याला मिळालेल्या मजुरीत पन्नास टक्के हवेत

प्रत्येक घरातल्या मुलांत पन्नास टक्के हवेत
ते नसले तर आईचे फक्त पन्नास टक्केच मिळायला हवेत
(बाबांची टक्केवारी मोजायचं कारण नसतं बरेचदा !)
आणि मग तुकडे तुकडे झालेल्या माझ्या अखंड भारताचे पन्नास टक्के मिळायलाच.. नव्हे द्यायलाच हवेत

पन्नास टक्के असायला हवेत
पण गणूला ते काही कुठे दिसले नाही
रात्रभर विचार करत राहिला
पण पन्नास टक्क्यांचे गणित सुटले नाही

पुढल्या दिवशी अनंत शंका घेऊन
तो शाळेत गेला , मोठी तयारी केली होती
थोड्याच वेळाने तो थंड पडला
मास्तरांनी अनेक टक्क्यांची अनेक गणिते मांडली होती

... ती ही अर्धवट !?

]]>
<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. ३]]>Sat, 26 Nov 2011 21:20:59 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2409/1एकच खिडकी..
हे अगदीच खरंय की अज्ञानात सुख असतं. हे सगळं मोकळं-धाकळं जग .. त्याला बघण्याची कल्पना फार सुखावह आहे. पण जग तेवढं सुंदर आहे का ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. लहानपणापासून प्रत्येक गोष्टी आणि त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टीकोन यांच्यात काही गंभीर प्रश्न आहेत. मन हे एक असं मोठं घर आहे ज्याला अनेक खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीतून वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मुक्त विचार करणे म्हणजे सगळ्या खिडक्या उघडणे.. पण कधी कधी बाहेरच्या गोष्टी बघून असं वाटतं की सगळ्या खिडक्या बंद कराव्यात .. काहीही बघू नये .. फक्त एक खिडकी उघडी ठेवावी !
एक खिडकी ..
सळयात अडकलेली
काळोखात जखडलेली


त्यातून दिसते एक शर्यत
शितासाठी भूतांची पंगत
मुर्खांशी मुर्खांची संगत आणि
रस्त्याकडेला बघ्यांची गम्मत

ते चित्र बघवत नाही
ती खिडकी उघडत नाही

एक खिडकी ..

काटकोनात मोजलेली
पडद्यांनी झाकलेली

पडदा उघडला
की शाळेत जाणारा एक मुलगा दिसतो
पाठीवर पुस्तकांचा गठ्ठा दिसतो
युनिफॉर्म शाईने भरलेला असतो
वर्ग भरलेला असतो .. तो आंगठे धरून असतो


परीक्षेच्या भीतीने आजही झोपेतून उठतो
या पडद्यांना मी झाकूनच ठेवतो

एक खिडकी ..

काचा अंधुक थोड्या धुरकट
सारं काही काळं सारं मळकट
माणसं नाहीत फक्त मुखवटे
छोट्यांना गिळतात मासे मोठे
प्रेमाच्या गुलाबाला स्वार्थाचे काटे
आणि फसवे शब्द ... खोटे ... फक्त खोटे

बाहेरचा गोंगाट कळत नाही
या खिडकीकडे पाय वळत नाही

एक खिडकी ..

मोत्यांनी मढवलेली
शिंपल्यांनी सजवलेली
ताऱ्यांनी नटवलेली
आरशांनी बनवलेली

इंद्रधनुष्य सप्तरंगात हसत असतो
चंद्र सूर्याशी लपंडाव खेळत असतो
हातांनी डोंगर मेघांना धरत असतो
झऱ्याचे घेऊन रूप थेंब नदीला मिळत असतो

कितीही मोठा झालो तरी हे वय सरत नाही
इतकी वर्ष झाली पण बालपण विसरत नाही


कंटाळा आला की या खिडकीत बसून घेतो
थोडा रडून घेतो थोडा हसून घेतो  

मनाच्या घराला खिडक्या अनेक..
ही एकच खिडकी उघडी ठेवतो
बाकी सगळं बंद !


हे बरंय ..
जगातल्या बहुतांशी लोकांचा एक हेका असतो की दोष त्यांचा नाही .. त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना त्रास देतात छळतात. पण खरच सांगतो कधीकधी खरोखर आजूबाजूची लोकं त्रास देतात. याहून वाईट प्रकार म्हणजे जेव्हा लोकं तुमच्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवतात कारण त्या गोष्टी तुमच्या आहेत ! त्यांना काय करायचं ?

खरंच सांगतो तुम्हाला 
प्लीज कोणी खोटं मानू नका
थोडं मनातलं सांगतो 
किमान त्याला तरी आक्रस्ताळेपणा म्हणू नका 
कारण...
हे बरंय...
तुमचा तो हजरजबाबीपणा
आमचा तो आघाऊपणा !

तुमचं ते professionalism 
आमची ती bureaucracy ! 

तुमचं ते सोनं
आमचं ते पितळ !

तुम्ही करता ते cost-cutting
आमचा तो कंजुषपणा !

तुमची होते ती गैरसोय 
आम्ही करतो तो आळस !

तुम्ही करता तो नवा प्रयोग
तुम्ही करता ती नवनिर्मिती

आणि
आम्ही करतो ती नस्ती उठाठेव !

तुम्हाला होतात त्या वेदना 
तुमचा असतो तो आक्रोश 
आणि 
आमचा असतो तो कांगावा !

तुम्ही जपता ती संस्कृती 
आम्ही जपतो ती अंधश्रद्धा !

तुम्हाला यश मिळतं तेव्हा त्या मागे अपार कष्ट 
आणि 
आम्ही कधी जिंकलोच तर इतर स्पर्धक ताकदीचे नव्हते !

खरंच अनुभवाने सांगतो खोटं बोलणार नाही 
कारण ..
हे बरंय ..
तुमचा असतो तो स्पष्टवक्तेपणा
आमची असते ती तक्रार ... ?!


कायम..
कधी कधी मनाची घुसमट होते. ही घुसमट माणसाला एकटा पाडते. आणि माणूस एकदा एकटा पडला की तो विचार करू लागतो. विचार करता करता मनाला अनेक रस्ते सापडतात हरवलेल्या वाटा सापडतात. मग तो त्याला पडलेले प्रश्न परत स्वतःला विचारतो. त्यांची उत्तरं ही मिळतात. या उत्तरांमध्ये जर मनाने स्वतःलाच जबाबदार ठरवलं तर तो स्वतःला समजावतो. पण जेव्हा कळतं की त्याच्याबरोबर घडलेल्या बऱ्याच वाईट गोष्टींचे कारण तो स्वतः नाही तेव्हा मात्र परत अनेक प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे त्याच लोकांकडे असतात. अशा वेळी काय करायचं ? ते जे वळ मनावर उठतात ते कायमसाठी असतात ..

हसून घ्या जेव्हढ हसायचय
तुमचे नियम पाळले की दुसरं काय व्हायचय
नकळत आयुष्याला जी चौकट बसली ... ती कायमची

तुम्ही का म्हणून प्रश्नांचा सपाटा लावला आहे
मला त्यांचा आता कंटाळा आला आहे
मला त्यांची एकदाच उत्तरे जी मिळाली ... ती कायमची

जरा मनासारखं वागलं बोललं तर वेडा म्हणाल
नाहीतर कामाचा घोडा म्हणाल
खुळेपणाची जी पाटी दारावर टांगलीत ... ती कायमची

तुम्हालाही कधीतरी दुःखाची जाणीव होईल
जेव्हा प्रत्येक चुकीवर प्रश्न उभा राहील
तेव्हा जी जखम मनाला होते ... ती कायमची

फुकटचे सल्ले देणं सोपं सरळ असतं
एकाचं पायरी जपणं दुसऱ्याच मरण असतं
पण एखादी संधी जी निसटून जाते ... ती कायमची


कोण्या एका तीरावर ..
ज्याला जे हवं आहे ते त्याला मिळू नये हा तर नियतीचा सगळ्यात लाडका खेळ. हे दररोजचं चित्र आहे की मनाला नेहमी प्रश्न पडतात कारण इच्छा आणि नशीब यांचं कधीच जमत नाही. दररोज प्रश्नात अडकलेले जीव दिसतात. ज्या जीवाला प्रेम मिळतं त्याला एक तर त्याची किंमत नाते किंवा त्याच्याकडे ते प्रेम घ्यायची ताकद नसते या उलट काही जीव फक्त जगात असतात पण त्यांना प्रेम करणारच कोणी नसतं एक गाव कधी वसत नाही आणि दुसरं वसुनही ओसाड राहातं. असं काही बघितलं की मन उदास होतं थोडा खुश होतं थोडा राग ही येतो .. पण करू काहीच शकत नाही. मन फक्त ही आजूबाजूची चित्र मनात साठवत असतं !
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही

कुणाचे आसुसले डोळे
त्या चंद्रास पहाया
कुणाच्या क्षितिजावर
मेघाची काजळमाया
जळत राहिली ती फक्त रात्र
त्या अंगणावर चांदणे, दिसलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही

पावसाचा थेंबही येथे
वैरी जन्मांतरीचा होतो
अश्रू होतो कुणाचा
कुणाचे सारे वाहून नेतो
आता आठवणींचे आनंत काटे
जपण्यासाठी हाती काही उरलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही

दोघांच्या हातात कधी
होते एक फूल नाजुकसे
रोज नवे उमलून ते
हळुवार गाली लाजतसे
नियतीने ओढल्या क्रूर रेषा
एक सुकून गेले एक फुललेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही

जणू हृदयाची दोन शकले व्हावी
एकाला विरह मिळावा एकास विष मिळावे
नियतीच्या तीरावर दोन गावे
...
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही     

अस्वस्थ जरासा इथे मेघ होतो ..
मन .. मन एकट बसतं.. विचार करतं.. स्वप्न बघतं.. चित्र रंगवतं. जेव्हा जेव्हा मनाला भीती वाटते , क्षितीज दूर दिसतं तेव्हा ते जास्त कल्पना करतं, स्वप्न बघतं. हे अगदीच सहाजिक आहे की मनाला तेच बघायचं असतं जे त्याला हवं असतं. आणि जेव्हा मनापुढे अंधार येतो तेव्हा त्याला स्वतःहुन आठवण येते ती देवाची. त्याची फक्त कल्पनाच मनाला सुखावून टाकतं. तसंच काहीसं स्वप्न कधीतरी माझं मन उघड्या डोळ्यांनी बघतं .. चांगलं वाटतं .. की पाउस पडून गेलाय आणि फक्त एक निर्मळ तळं !
अस्वस्थ जरासा इथे मेघ होतो
विजेचे पाश का धरणीला मिळे ?
धूळ स्थिरावी खडकांवरी अन
देह पाकळीचा तरी का जळे ?

गळक्या कौलांमधुनी घराच्या
थेंबांची झिरपे वसंत गाणी
झडून उरल्या उंबऱ्यावरती
उभा एक सन्यासी अनवाणी

संदिग्ध डोळ्यांमधून संथ
भूक युगांची अलगद झरली
वाहून गेल्या दाही दिशा अन
चूल मातीची कालच विझली

वळून पाहिले तसा उमटला
आणि पसरला अंधार लोळ
शेवटल्या एका इथे दुधाच्या
थेंबाला मिळते अमृतमोल

समोर आला क्षणभर हसला
सावळया हाती ओंजळ केली
भूक त्याची सत्यच नव्हते
भगवंत प्रतिमा समोर आली

जशी पलटली तृप्त पावले
इंद्रधनू क्षितिजावर उजळे
अंधुक झाली पायवाट अन
अंगणी उरले निर्मळ तळे 


निलाजरा..
मन जेव्हा कुठेतरी अडकलेलं असतं .. रस्ता मिळत नसतो .. अंधार नसला तरीही एक अंधुक वातावरण असतं ! अधांतरी आयुष्य हे तर विनाशापेक्षा बिकट असतं .. अशा वेळी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्नांमधून एखाद्या कवडशाप्रमाणे येते तेव्हा मन त्याच्याकडे धाऊन जातं. ती गोष्ट सुद्धा मनाला सावरते त्याला आधार देते. आणि जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मन आपापल्या वाटेवर चालू लागतं. मला प्रश्न पडतो की मन स्वार्थीपणा तर नाही करत आहे ना ? तसं असेल तर मी सुद्धा स्वार्थी ठरेन कारण माझं मनही कवितेकडे धावतं !

अर्थांची घालून वेसण
अक्षरांच्या राशी रचल्या
सम्भ्रमांच्या झेलून लाटा
शब्दांच्या भिंती खचल्या

किती सजवले आरसे
प्रतिबिंबाची गोड लक्तरे
प्रश्नांचे दुर्बोध चाळे
वास्तवाची संदिग्ध उत्तरे

खिडक्यांना गजांचे बंध
अंगणाला कुंपणकाटे
भिती भुताची दाराला
येईल कधी चोरवाटे

शांत निजल्या बिचाऱ्या
कवितेवर घारीचा डोळा
झाडाच्या सावलीपाशी
का स्थिरावतो पाचोळा

सावरून घेत स्वतःला
मी पुन्हा उचलतो शब्द
फाटलेल्या पदरावरती
सजवतो स्वप्न विदग्ध

स्वप्न सजवताना थोडे
अर्थांना विषारी पंख
आतून निलाजरा मी
तिला पुन्हा जगाचे डंख !


धुकं..
खरं पाहिलं तर फक्त विचार करत बसणं, कल्पना करणं एवढंच काम करत नाही. निसर्ग सुद्धा फार अजब गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी नेहमी घडताना दिसतात. रोज येणारा दिवस रोज येणारी संध्याकाळ रात्र वारा पाउस .. यातून कधीकधी संध्याकाळी शांतपणे नकळत पृथ्वीवर उतरणारं धुकं. काही क्षण असं वाटतं की सगळं काही शांत झालं आहे .. धुक्यात आलेला संधिप्रकाश नकळत मनामध्ये एक शांत पोकळी निर्माण करतो ! तिथे असलेलं आपलं घर आणि मन दारापाशीच उभं रहात .. का ते मात्र कळत नाही आणि समोर फक्त धुकं असतं ..

एक गाव
एक दोन घरे
एक दोन तारे
अर्धवट

एक दिवा
त्याचे संक्षिप्त जळणे
एका स्त्याची
अंधुक अलिप्त वळणे

एक रात्र
अंधाराचे कोंदण
एक खिडकी
दवबिंदूचे गोंदण

एक झाड
निजलेली पाने
एक भिती
अव्यक्त तराणे

दमट हवा दमट स्पर्श
दमट भूमी दमट श्वास
एक कोपरा एक एकटा
एक मन वेडे आभास

एक सावली
एक विश्व
एक बिंदू
गिळून सर्वस्व

बाकी फक्त
धुकं धुकं आणि धुकं ...

चंद्र हळवा ..
असंच बरेच दिवसांनी 'ती' आली. आता मात्र मला तिची सवय झालीये आणि तिलाही माझ्यावाचून करमत नाही हे तिला कळून चुकलंय. ही संध्याकाळ नेहमीसारखी नसते ही संध्याकाळ जरा वेगळीच असते आणि आता मला ती ओळखू येऊ लागली आहे. ही संध्याकाळ म्हणजे रात्री झोप न लागण्याचा जणू एक संदेशाच असतो. मला जाणवू लागतं आणि जरा का होईना बेचैन होतो. आता मी तिलाही दोष देणं बंद केलंय तिला समजावतही नाही. पण हे खरं की अवेळ असली तरी सुंदर दिसते आणि माझं दुःख हे की वेळ चुकीची असते. अशीच आज ती पुन्हा आली आणि ..
आज तू पुन्हा आलीस
क्षितिजाच्या पटावर का, ओढलीस काजळ रेषा ?
की तुला करमले नाही, दिवसाच्या दूर देशा ?

आज तू पुन्हा आलीस
श्वासांच्या पैलतीरावर, अगतिक आज अबोला
पाश अंतरी झेलणारा, संदिग्ध उसासा ओला

आज तू पुन्हा आलीस
विसरून कालच्या वाटा, विसरून दिशांचे ज्ञान
विसरून इतिहासाचे, फाटलेले गोंडस पान

आज तू पुन्हा आलीस
भूतकाळाची भिंगरी, मनाच्या तळाशी सोडून
मी बांधल्या अंगणाची, तकलादू भिंत तोडून

आज तू पुन्हा आलीस
ताऱ्यांना झाके कशाला, गोऱ्या हातांचा तळवा ?
तुझ्या पापण्या सुरेख, माझाच चंद्र हळवा !

सांग मला तू आता, मी काय करू सुखाने ?
स्वप्नात सुटका नाही, मी जागा तरी कशाने ?
आज तू पुन्हा आलीस ..

]]>
<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. ३]]>Thu, 15 Sep 2011 00:01:27 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2409/first-postनाते
एकट्याने प्रवास तरी किती करणार ? कोणीतरी सोबतीला लागतंच.. आणि या अवघड पण हळव्या रेषांवर चालायचं म्हणजे नुसतं कोणीतरी बरोबर असून चालत नाही. मन अशा नुसत्या आकृत्यांना आपल्या बरोबर घेत नाही, इथे फक्त ऐहिक सोय नसते. हा एकटेपणा वेगळा असतो, तो फक्त जाणवतो. मन सतत त्या सोबतीची , सख्याची वाट बघत असतं. जो त्याच्या बरोबर चालेल, त्याला सावरेल .. मनाला कोणीतरी आपलं हवं असतं. तो कोणीतरी आपलं दिसलं की मन त्याच्याच मागावर लागतं. ज्या क्षणी " मी सुद्धा कुणाला तरी आपला वाटतो ! " याची मनाला जाणीव होते त्या क्षणी ती मने एकमेकांत अशी काही गुरफटून जातात की ती एक च होवून जातात आणि मग सारं जगच बदलून जातं ! अशा वेळी मनाला प्रश्न पडतो दोन वेगळ्या जिवांच असं कसं झालं ? हे कोणते नाते आहे ?

दोन जीव का जन्मले
ती बंधने ताडण्यासाठी
तारांगणी जन्मले चांदणे
पृथ्वीवर सांडण्यासाठी

पंख मनाला लागले
नियतीचे खेळ हे कुठले
गीत गायले डोळ्यांनी 
अंगणाशी नाते तुटले

कुंपण झाले उभे
जगाचे क्रूर बाभळीचे
अवचित पडले पाउल
तुजसाठी या भोळीचे

मेघराणी आज विचारी
झुकुनी पर्वतावरी
सागरात जन्म माझा
पण भाळले तुजलावारी

तो म्हणाला तिजला
खेळ हे ना मनातले
अपुल्यातले बंध हे 
अवतरले स्वर्गातले
हे बंध स्पंदनांचे ..हे नाते हृदयातले

तू थांब जरा..
जगात बंधने नसती तर मनाला अर्थच राहिला नसता. प्रेमात पडलेली 'ती' मनस्वी होते याचं मुख्य कारण म्हणजे ही बंधने .. कधी समाजाची कधी कुटुंबाची कधी आणखीन कुठली ! तेव्हा अशा मनस्वी मनाला जर बंधने तोडायची असतील तर एकच मार्ग आहे यांतून मुक्त होणे. अशाच एका रात्री ती त्याच्याबरोबर पळून जाते , जेव्हा सगळं शांत असतं, निद्रिस्त असतं . संपूर्ण आयुष्य प्रियकराबरोबर घालवायला मिळणार असलं तरी ज्या अंगणात ती खेळली वाढली त्यातून जाताना पाय थोडे जड पडणारच ...

तू थांब जरा , मी आहे रे मागे
गाव ग्लानितले होईल रे जागे

विश्व माझे टाकून आले सारे
भातुकलीचे मोडून रे पसारे
अंगणी लपविला बालपणीचा
काटा आज मला रे लागे
तू थांब जरा ...

दाराचे घराचे बंधन वाटे फुके
जाईंचे आता चुंबन वाटे फुके
उमगली वाट मला ना दुसरी
मन माझे मलाच सांगे
तू थांब जरा ...

खाईन मी चंद्राची रे भाकरी
असो राहण्यास मातीची पायरी
ओवीन सारे विश्व तुझे
किरणांचे करून धागे
तू थांब जरा ...

निरोप
मन ज्या रेषांवरून चालतं त्या रेषा कितीही लांब असल्या तरी त्यांच्यावरच्या पाउलखुणा अगदी स्पष्ट दिसतात .. अगदी दूर पर्यंत .. कधी कधी तर अगदी सुरुवातीपर्यंत ! मग सासरी आलेल्या तिच्या मनाला या खुणा पाहिल्यावर माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. या आठवणीचं मोल मला कळलं जरी नाही तरी तिच्या डोळ्यात मला ते दिसत असतं कारण तिला मुळी ते लपवताच येत नाही. कुतूहल, विरह , माया ,मैत्र अशा अनेक छटांचा मिळून आठवणीचा एक आपलाच रंग तयार होतो आणि क्षितिजावर पसरू लागतो. मन मागच्या वर्षी पावसाबरोबर पाठवलेल्या निरोपाची वाट पाहू लागतं ... उत्तरं येत नाहीत म्हणून मन उदास खिन्न होवून जातं. पण आज तो क्षण तिला दिसत आहे .. पहिल्या पावसाबरोबर तिच्या माहेरून निरोप आला आहे ! मग मन उदास कसं होईल बरं ?!

डोंगराच्या पायवाटे , छोटेसे माझे घरटे
अंगणी झाड एकटे , प्राजक्ताचे     ||

दगडाच्या आहे भिंती , कौलेही त्याच्यावरती
खिडकिंच्या काचांवरती, चंद्र कोरलेला     ||

नांदावे स्वर्गी जसे , स्वप्नाहून गोड भासे
सौभाग्य लाभले तसे , घरात या     ||

उंबऱ्याच्या पलीकडून , जाईच्या वेलींमधून
स्वप्न येते भरून , माहेरचे  कधी   ||

झाले दिवस अनेक , हाक नाही आली  एक
तुझी लाडकी लेक , आहे इथे     ||

मी सांगते घनाला , दे निरोप माहेराला
माझ्याही आसवाला , बरसून ये     ||

आज दाटला घनार्त, पृथ्वीच्या पापणीत
इंद्रधनुही त्यात , सप्तरंगी     ||

तो वाहून आला आहे, तो दाटून आला आहे
तो सांगून आला आहे , माझा निरोप     ||

वाऱ्याचे भरले उर, नदीला आला पूर
कानी कोकिळेचे सूर , मोहक असे     ||

तू येरे असा धाऊन, चिंब मला भिजवून
आसवांना टाक धुवून, आठवणीच्या     ||

पाउस पहिला माझा, वर निरोप माहेराचा
उदासवाणी वाचा , आता कुठे ?!    ||

एकटी..
दिवसामागून दिवस जात असतात. सगळ्या गोष्टींप्रमाणे मनाला संसाराचीही सवय होवून जाते. मन कितीही मुक्त होवो त्याला चक्र आवडते. चक्राचा एक फायदा असा की आपला माणूस, आपला सोयरा रोज आपल्याला दिसतो. हे चक्र जेव्हा कधी बिघडतं तेव्हा मात्र मनाची चलबिचल होते. मन नवीन परिस्थितीत कोंडून जातं. असंच काहीसं तिच्या मनाचं ही होतं जेव्हा रोज सायंकाळी दिसणारा तो तिला दिसत नाही. संध्याकाळ जाऊन रात्र आली तरीही त्याची चाहूल नाही. तेव्हा मात्र मन कावरं बावरं होतं .. सगळ्या जगात अगदी एकट पडतं ..

सरली संध्याकाळ आणिक
सरले सारे प्रहरही
दाराशी राहिली उभी
सवत काळी रात्र ही

एकटी घरात मी
पाउस दाटलेला
ज्योतीत पाखराचा
एक पंख फाटलेला

परतून आले पक्षी
झाडे झाली अबोल
त्या दिनकराहूनही मोठे
मज कुंकवाचे मोल

तू गेलास त्या वाटेवर
सावल्यांचे सत्र पसरले
सांजेचे देवापुढती
निरंजन आज विसरले

स्वप्नांचा शाप माझा
घरात येऊन बसला
घाबरे मी स्वताला
हा खेळ मनाचा कसला ?
या वेड्या मनावर मग
देव जरासा हसला
समोर वळणावरती
तू चालताना दिसला !

सुना झोपाळा ...
तिचं मनही आता स्वप्न पाहू लागलंय. मन असतंच असं त्याला स्वप्न बघायची एक विलक्षण सवय असते. मन आपापल्या रेषांचे अंतर पार करत असताना नवीन नवीन रेषा ही बनवत जात असतं. नद्यांप्रमाणे याही रेषांना फाटे फुटतात, नवे प्रवाह वाहू लागतात. त्याही प्रवाहांना वाहायचं असतं. पण आता मात्र फक्त तिला यांवरून चालायचं नाहीये. ती आता वाट बघते आहे, तिच्याच नव्या जन्माची. अशी ओढ लागलेलं तिचं मन आजूबाजूला सगळीकडे जीवन बघून आसुसलेलं होवून जातं. पक्षिणीचे पिलू असो वा वेलीची कळी असो मातेला त्याची चाहूल होतेच. तिचं मन आता याच चाहूलीची वाट बघतंय ... अधीर होतंय ... थोडे अश्रूही ढाळतय !

धरणीवर उमलून आल्या चैत्राच्या पाउलखुणा
पानांवर आसुसलेला झोपाळा वेलीचा सुना

रोजच येतो सूर्य रोजच गातो पक्षी
रोज जन्मतो चंद्र घेऊन तारकानक्षी
मेघाचा लागे सुगावा अंकुर जन्मतो पुन्हा
पानांवर ...

झाडांच्या फांदिंवरती होताच किलबिलाट
दरीत नव्याने सुटतो वारा असा पिसाट
इवल्या पावलांची चाहूलना आली कुणा
पानांवर ...

पक्षिणी भरवी घास मायेची वेदना होते
रोज पहाटे ती अश्रूंची ओंजळ नेते
हळुवार रांगणारा ध्यास एकला मना
पानांवर ...

अंकुर ..
एका स्त्रीच्या मनाला बहुदा बाळाच्या जन्माच्या वेळच्या वेदानांपेक्षाही त्या बाळाची जन्माची वाट बघण्याची वेदना जास्त होत असावी. कारण तिच्यामध्ये वाढणारं ते बाळ म्हणजे तिची साधना असते. साधना म्हटली की श्रम आले , वेदनाही आल्या. मातेच्या मनाला या वेदनाही सुखावून टाकत असतात. तिचे मनही असेच अधीर झाले आहे की कधी त्याला प्रत्यक्ष बघीन कारण देवाने दोन जीवांना एकमेकांशी बांधून ठेवलेलं असतं पण ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. तिला त्या बाळाचे फक्त हुंकार ऐकू येत असतात. ते बाळ जेव्हा आपले पाय झाडत असतं तेव्हा तिला वाटतं की त्याला आता बाहेर यायचंय .. पण वेळ आलेली नसते आणि म्हणून वाट बघण्याची वेदना तिला बहुदा जास्त होत असणार. अशाच एका वळणावर ती उभी असताना तिच्या मनाला त्या साधनेचं फळ मिळतं आणि तिच्या अंगणात एक अंकुर जन्माला येतो !

वळणावर होती उभी , ती वाट पाहत होती
रिकाम्या पदरावरती, अश्रूंना वाहत होती

अवखळ वीजही तेव्हा, मेघात खेळत होती
हातांना पसरून आणिक थेंबांना झेलत होती

तिच्या कुळाचा दिवा, तिने उजळला होता 
रक्ताच्या इंधनाचा, एक थेंब जळला होता

उचंबळून याव्या, घागरी गर्द घनाच्या
अधीर होत जाव्या, कल्पना तिच्या मनाच्या

ओटीत तिच्याही पडले, एक फुल साधनेचे
गर्भात तिला मिळाले, ओंकार प्रार्थनेचे

मरण वेदनांचेही आता, सुख वाटले तिला
तिचाच जन्म येथे, तिच्या कवेत आला

अस्तित्वाच्या खुणा, तो हुंकार सांगत होता
अमृताचा वर्षाव आता, धरणीवर सांडत होता
भिजलेल्या मातीवरती, अंकुर नांदत होता
इवल्याश्या पावलांनी, तो कृष्ण रांगत होता !


सती ..
चुकून कधीतरी थोडसं मिळालेलं सुख तर शत्रूलाही बघवत नाही मग नियती कशी माफ करेल ? देवाने तिला सर्व काही दिलं. सौंदर्य, प्रेम, घर आणि आता तिच्या अंगणात तिचा चंद्रही रांगू लागला आहे. मग नियती हे सगळं कसं बघत बसेल ? तिने आपला डाव साधलाच ...जिथे विश्वास आहे तिथे विश्वासघात आलाच ! स्त्रीला जसं मातृत्वाचं वरदान मिळालंय तसाच पुरुषाला मोहात गुंतण्याचा शाप मिळालेला आहे. पण हा शाप तिच्याच आयुष्यात घर करून रहावा ही तर नियतीची क्रूर थट्टाच. ज्या माणसावर तिने प्रेम केलं ज्याला सर्वस्व वाहिलं ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तो जेव्हा कोणाच्या मोहात अडकतो तेव्हा तिच्या आत्म्यालाच धडक बसते आणि तिला संसाराचे तुकडे तुकडे होताना दिसतात. यात तिच्या परस्त्रीवरील एका पत्नीच्या इर्षेची झाकही दिसते.

कुंपणावर बसून तो, कावळाही चुगली करतो
गावातल्या वाटेवरती, वाराही कान भरतो

बाहुतला स्वर्ग हरवला, नसे स्पर्श साखरेचा
रात्रीच्या समयीतून येतो, वास का मदिरेचा ?

पायीच्या थकल्या धुळीचा, रंग कसा रे काळा ?
परतीचा गंध रस्त्याचा, का वेशीवरून आला ?

विसरले अपराध सारे, गोकुळी यमुनेकिनारी
लीलांचे प्रश्न तरीही , वृंदावन मला विचारी

अनंत श्वासांची गाठ रे, सती मी जन्मांतरीची
सूर्य कुंकवाचा अस्तालागे , ज्वाला ही अंतरीची

ती रडून केविलवाणी , विचारी भग्न मनाला 
अविचल हक्क माझा , राधेला का मिळाला ?

कोणे एके काळी..
मी पाहिलेली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे माझी एक मैत्रीण .. मैत्रीण म्हणजे खरोखरीच फक्त मैत्रीण ! अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य हे जरी खरं असलं तरी तिची एक सवय म्हणा, किंवा स्वभावदोष म्हणा की मुलांचा वेडेपणा म्हणा तिने आत्तापर्यंत एवढ्या बॉयफ्रेंड्स णा बदललंय की तिला सुद्धा आठवत नसेल. दरवेळेस कोणी नवा सापडला की ती आधी आम्हाला भेटवते. तेव्हा मनात विचार येतो की त्या मुलाला वाटत असेल आपणच पहिले ! मला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा आधीचा कोणी तिला भलत्याच मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवताना बघील तर त्याला काय वाटेल .. कदाचित तो असंच म्हणेल की कोणे एके काळी एक वेडा होता ..

वळणावरती एका पहिला, वसंत फुलला होता
तुझ्या बटांवर माझा पहिला, मेघ उमटला होता

तुझ्या ओठांवर अर्थ नवेले, थरथर सांगत होती
तुझी पापणी भातुकली, हातावर मांडत होती

ती वेळच होती अशी, हवेला भानही उरले नव्हते
सप्तरंग तुझे नी माझे, इथे स्वप्नात उतरले होते

वळता वळता कधी कधी, एक वळणही असले येते
सुंदर मुखावट्यांमुळे कधी, हे जगही फसले जाते

चकव्यांवाटे तसाच क्षण, तो नकळत निसटून गेला
फसगत भलती झाली होती, मनास पटवून गेला

आता कळते तुझ्या स्मिताचा, अर्थही साधा नव्हता
प्रेमासाठी तुला मिळाला, हा पहिला खांदा नव्हता

वळण सोडले चालू लागलो, गाव उजडला होता
कोणे एके काळी तुझा गं, एक वेडा कोणी होता  

१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...
काही काही घटना मात्र अशा असतात की त्या मनपटलावर अक्षरशः कोरल्या जातात ... अशीच एक घटना अगदी माझ्या समोर घडली. तो मुलगा आजही मला दिसतो. आनंदी असतो पण त्या मागे एक छोटासा काळोखा इतिहास आहे. एकदा त्याने काहीतरी लिहिलेलं. खरं तर ते तिच्यासाठी होतं पण मला वाटलं की स्वतःशीच बोलतोय .. मग म्हटलं त्याचं उरलेलं बोलणं मीच पूर्ण केलं तर ?! 

दिवसरात्र विचारतो आता 
मी चुकलो तरी कशाला ?
भलतेच उत्तरं मिळते की
प्रेमात पडलो तरी कशाला ?

ही खोटी कागदी फुले 
कशी माझ्याच पदरी पडली
की फसव्या संध्याकाळी 
ती पहिली भेट गं घडली 

काट्यावर चालण्याची शर्यत
साली हवीच का कोणाला ?
मग विचार करतो माझं 
नशीब लागणार कधी पणाला ?

साऱ्यातून सुटून गेलो 
अन मनीचा काटा निघाला ?
मन पुन्हा मला विचारे ...

पळूनच यायचे होते 
तर चुकला तरी कशाला ?


आज पुन्हा तुझी आठवण आली 
थोडं मागे वळून बघता ..
१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...


मोहनशाम
हे सगळं आजुबाजुचं पाहिलं लोकांचे प्रेम करण्याचे खोटे प्रयत्न पाहिले, खेळ .. फक्त खेळ पाहिले किंवा स्वतःची समजूत करून घेणारे दिसले की मन या सगळ्या प्रकाराला अगदी विटून जातं. मन जगापासून दूर जाऊ लागतं. स्वप्नातल्या प्रेम कथेत. ही प्रेम कथा म्हणजे एक राजा , एक राणी अशी नसून.. फक्त एक मुलगा आणि त्याच्यावर फक्त प्रेमच करणारी एक मुलगी यांची ती गोष्ट आहे. ही मुलगी म्हणजे 'राधा' आणि तो मुलगा म्हणजे कृष्ण ! मला तर असं वाटतं की आजही राधा यमुनेच्या तटावर कृष्णाला शोधत असेल .. कृष्ण आजही तिला मोहून टाकतो ..

थकलेल्या किरणांना क्षितिजावर मिळे विराम
सांजवेळी पैलतीरावर दिसतो मोहनशाम

स्पर्शून मनाला वारा नयनातून वाहून जातो
पृथ्वीच्या ओच्यात नभीचा प्राजक्त दाटून येतो

सूर वेणूचा मधुर अलगद येतो कसा कुठून ?
विश्वाच्या अंगणावर आणि कृष्णरंग ये दाटून

वृंदावनी शोधते राधा तिथेही नसतोस तू
सुरांमागे धावते बिचारी असा छळतोस तू

राधा थकून जाते, हरते मिश्कील हसतोस तू
ती शेवटी मिटते डोळे नी समोर असतोस तू


पाप..
जगाच्या नीती अनीतीचे स्तर कितीही ढासळो. चूक कुणाचीही असो. आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयांचा स्त्री आणि पुरुष असण्याशी संबंध नसतो. पण भोगावं लागतं ते तिलाच. निसर्गाचा नियम म्हणा समाजाचा नियम म्हणा किंवा आणखी काही म्हणा हेच सत्य आहे. अशा वेळी तिला भिती वाटू लागते. ती त्याला बोलवत असते ते आधार म्हणून नव्हे तर भविष्याला कलंक लागू नये म्हणून... तिला त्या पापाची भिती वाटत असते !
सांजेला खिडकीवरती
भीतीचे काजळ पसरे
कौलांमधून अवचित
चंद्राची राखही उतरे
 
इंद्रियांच्या संकेतांचे
उजळले अंगी दीप
या अथांग दर्यामधेही
असतेच एकटे द्वीप
 
जाईच्या तू दिलेल्या
वेलींवर फुलले पाप
अंगणात पाचोळ्याशी
मज दिसे विषारी साप
 
ओंजळीत माझ्या पडावे
जे तेज अस्ता गेले
झऱ्याचे निर्मळ पाणी
मातीत आज मिसळले
 
तू असता इथे सख्या रे
का मला कशाची भिती
शब्दांचे स्वैर हे काटे
मी झेलू तरी रे किती ?

त्याला उठवू नकोस बाळे ..
इतिहास दोन स्त्रियांना कायम घाबरत राहील कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. कैकेयी मुळे स्वतःच्या हक्काच्या माणसापासून दूर झालेली आणि एक तप विनाकारण वनवासाहूनही भयंकर विरहाला सामोरी गेलेली उर्मिला आणि सत्य आणि असत्य यांच्या द्वंद्वात नाहक भरडली गेलेली उत्तरा ! उर्मिलेला तिचा लक्ष्मण परत भेटला पण उत्तरा मात्र अभिमन्यूची वाट पहात राहिली तेही अशा वेळी जेव्हा ती मातृत्वाच्या चौकटीमध्ये उभी होती.. तिला तिचा अभिमन्यू मिळालाच नाही .. तिचं सांत्वन करणं कृष्णालाही अवघड गेलं !

त्याला उठवू नकोस बाळे,
तो आता निजला आहे,
अस्ताची बनून धूळ
खडकावर बसला आहे

तुझ्या चिमुकल्या हाका
त्याला न उत्तर उरले,
थकलेले श्वास तयाचे
पश्चिमेला कधीच सरले

झोप ही त्याची असली
गळले स्वप्नांचे पंख,
त्या कोमल बाळमुठीवर
तुटल्या चुड्याचे डंख

एकट रथाला त्याच्या
वेढून उडाल्या घारी,
घेऊन सत्य पताका
तो गेला वैकुंठ दारी

सत्याचा अलौकिक वेल
फुलला आज असाही,
सुकलेल्या अश्रुंचा आज
होवू दे मेघ तसाही

भगवंत कैवारी त्याचा
हे निजणेही दंश नाही,
तू रडू नकोस बाळे
वंश त्याचा निर्वंश नाही
]]>