<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. - मनपटलांवरच्या रेषा.. २]]>Thu, 03 Mar 2016 23:49:22 -0800Weebly<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. २]]>Sun, 04 Dec 2011 01:12:15 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2408/2__माधवी..
स्त्री आणि पुरुष यांच्या मधला खरं सांगायचं तर मोठा फरक म्हणजे सहनशक्ती. सहन करणारी स्त्री आदर्श स्त्री तर सहन न करणारा पुरुष हा आदर्श पुरुष !.. असं म्हणणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं. कारण सहन करणाऱ्याला नेहमीच जास्त भोगावं लागतं .. नव्हे समाज अशांनाच छळण्यामध्ये मोठा पुरुषार्थ समजतो हेही एक सत्य आहे. स्त्री - पुरुषाच्या प्रदीर्घ वाटांवर या पुरुषार्थाचे विद्रूप दर्शन मिळते ते "माधवी" च्या आयुष्यात. ययाती सारखा पिता लाभूनही .. चिरतारुण्याच वरदान मिळूनही केवळ धर्मामुळे जिच्यासाठी हे वरदान स्त्रीत्वाचे महत्पाप झाले ती ही माधवी. कोणी एका योग्याने तिला दक्षिणा म्हणून नेले आणि स्वतःच्या गुरुदक्षिणेसाठी तिच्या सौंदर्याचा व्यापार केला. शेवटी ती सतीही झाली नाही .. आईही बनून राहिली नाही. हेही कमी होते की काय म्हणून तिचा स्वयंवर रचला गेला. तेव्हा मात्र ती सगळं काही टाकून सन्यस्त झाली. जेव्हा कधी मला पुरुष असण्याचा अहंकार होतो तेव्हा दूर वर एक सन्यासी स्त्री दिसते .. माधवी !

__तुझ्या ओंजळीचे गंगे, उमटले डोळ्यात थेंब
पुन्हा पाहूदे मजला, माझेच शुभ्र प्रतिबिंब 

चांदणी झोपाळा इवला ,झोपेला उद्याचे भय
धर्माला अनाहत असते, प्राक्तनाचे क्रूर वलय 

माझ्या कुळाचा वृक्ष महान,आणि सावली थोर
सावलीत अचानक आला,माझ्या देहाचा चोर 

आंधळी तहान त्यावर, मेघांनी स्वैर पसरावे
बाहुलीच्या पदरावरती, सोन्याचे डंख उमटावे 

जन्माच्या समईवर माझे, अश्रुंचे वाहिले तेल
गर्भाचे प्रत्येकाने, का कसे ठरवले मोल

तरीही चुडा सजवला, हसतीलही आता सगळे
माधवीच्या इंधनात, धर्माचा चंद्रही उजळे 

मखमल इथली टोचे, सोन्याची नकोही दर्पणे
तुम्ही दाखवा सयांनो, मजला पश्चिमवळणे 

हातावर बसली आता, स्त्रीत्वाची गर्द लकेर
गोकुळात होवू दे आता, मम दयाघना अखेर

__शिळा ..
माझ्या आजूबाजूला दिसणारी अजून एक विद्रूप गोष्ट म्हणजे .. माणसाचे धासळलेले नीती अनीतीचे स्तर. पाप करणे ही एक गोष्ट आहे आणि त्याचा पश्चात्ताप होणे ही एक विलग गोष्ट आहे. किंबहुना काहींना वेळीच पाप केल्याची जाणीव होत नाही. स्त्रीचे चारित्र्य एक काचेचे भांडे आहे .. हे खरच आहे. पण आधुनिक म्हणणाऱ्या जगात हल्ली कधीकधी भोगाच्या मोहाला स्त्री स्वातंत्र्याची झालर चढवली जाते. पाप-पुण्य नीती-अनीती या पुरेपूर व्यक्तीनिष्ठ आणि वैयक्तिक गोष्टी आहेत हे मी जाणतो. तरीही आजही जेव्हा वाट भरकटलेली एखादी स्त्री जेव्हा पुन्हा समाजात येऊ पहाते तेव्हा तिला डावलण्यात येतं आणि तेव्हा जर तिने कुणाला आपण अहिल्या असण्याची लाच दिली तर तर मात्र माझे मदत करणाऱ्या हातांना काजळी लागलीये की काय असं वाटू लागतं. कारण अहिल्येला मोह नव्हता, ती सती होती आणि तरीही तिला शाप मिळाला .. कदाचित म्हणूनच ती शिळा बनून श्रीरामाच्या वाटेत आली !

_सांजओझ्याची कसरत
मेघांची ओंगळवाणी
किती जणांनी प्यावे
एका ओंजळीत पाणी

पारध्याच्या हाती डाव
त्याच्याच हाती फासा
रंगात तुझ्या पदराच्या
आक्रंदला उसासा

शोधला मग ज्याने त्याने
आसरा सावलीखाली
शापाची करडी घार
शिलेवर घिरट्या घाली

ठेवू तुला कुठे मी
काजळी माझेही हात
की राघवाच्या वाटे
मलीन त्या पायात

कोणे काळी येथे
ती नशिबवंत एक होती
बाकीच्या शिळांची मात्र
उरली फक्त माती !

माझ्यापुरता .. 
बरेचदा असं होतं की नशीब आणि नियती आपापलं एक वेगळंच सत्र सुरु करतात. आणि प्रश्नांना एकदा सुरुवात झाली की पावसाळ्यात कधी नव्हे तो आटलेला धबधबा ओसंडून वाहावा तसे प्रश्न येऊन कोसळू लागतात. त्यांना फक्त कोसळणं माहित असतं. आणि मनाची अवस्था त्या मध्ये गर्ते खाणाऱ्यासारखी होऊन जाते. अशा वेळी त्याला फक्त यातून बाहेर पडायचं असतं बाकी काहीही विचार करणं परवडणारं नसतं. बराच वेल अनिश्चिततेमध्ये गटांगळ्या खाल्ल्यावर थोडा विसावा मन शोधू लागतं. पण तेव्हाही नियती त्याला स्वस्थ बसू देत नाही .. मग मात्र राग येतो आणि मनाला वाटू लागतं ही धडपड कोणासाठी ? कशासाठी ? थोडी स्वतःसाठीही हक्काची झोप मिळावी ..!
काळ्या कुट्ट मेघांनो ..
माझ्याच घरापाशी का असा थैमान
अघटीताचे फर्मान,
तो ही भल्या सकाळी ..

मी ही झालो असतो वारा
आणि विखुरलं असतं तुमचा अस्तित्व ,
तर मिळाले असते का
पृथ्वीचे आंदण
विजांचे लखलखणारे गोंदण ..

म्हणून म्हणतो
आत्ता नको हा धिंगाणा
आणि नको संदिग्धता ,
झोपू दे मला जरासा
फक्त माझ्यापुरता .. !


नदीचे अंतर..
माणसाचं मन बाकी कशालाही घाबरलं नाही तरी एका गोष्टीला निश्चित घाबरतं ... जेव्हा आयुष्याच्या एका वळणावर त्याच्या सत्वाची परीक्षा होते, जेव्हा त्याला निर्णय घायचा असतो. जगाने मोकळ्या केलेल्या अनंत वाटा आणि त्याची वाट यांमध्ये निश्चित मार्ग पकडायचा असतो. जेव्हा खरं काय आणि खोटं काय हा मुलभूत प्रश्न आ वासून उभा असतो आणि सात्यासत्याची सीमारेषा अदृश्य झालेली असते तेव्हा मन घाबरतं. अशा वेळी एकमेव मार्ग म्हणजे देवाला शरण जाणे. मनाला त्याचं मार्गदर्शन हवं असतं आणि त्यावर तो सारं काही सोपवून पुढे चालणार असतो.. अर्जुनाने जे काही केलं ती शरणागती नव्हे ... तो पुरुषार्थ होता ..
इथे संपल्या वेशी
इथे संपल्या वाटा
डोहाच्या चेहऱ्यावरती
काळाच्या अलगद लाटा

ओढू कशा कुठे मी
स्वप्नांच्या धुरकट रेषा ?
मुकलेल्या ओठांवरती
आली प्रार्थनेची भाषा !

उद्विग्न नदीचे अंतर
पलीकडे जायची हाव
अर्घ्याचे मोल तू राख
ते माझे नवीन गाव

सांडलेला प्रपंच माझा
देहावर मोह तवंग
क्षितिजाच्या पाठीवरती
कृष्णाचा श्यामल रंग

आता नको किनारा
मी सारे टाकले मागे
विठूरायाचरणी स्वर्ग
नको रोखूस चंद्रभागे

तसाही ..
एकदा देवाला शरण गेलं की माझ्या मनाची ताकद वाढते .. मन नव्या जोमाने काम करू लागतं कारण एक निश्चितता असते की तो आपल्या पाठीशी उभा आहे .. सर्व काही पहात आहे .. अशा वेळी मनात एक ज्योत मिणमिणते आणि त्याची किरणं पसरू लागतात !

अस्ताने दिले कशाला रात्रीस मोकळे अंगण ?
ओंजळीत लपवून आली प्रश्नांचे लोभस गोंदण
 
मजपाशी ना समिधा जळणाचे इतुके इंधन
माझ्याच प्रार्थनेला का दैवाचे फसवे बंधन ?
 
वाटांनी अंग झाकावे मेघांचे झडावे शील
तिच्या पाऊली धुळीला स्वप्नरंगांचे का मोल ?
 
मी थोडे वेचून घेतो स्वप्नांचे अमूर्त रंग
वाळवंटी रुजले बीज पाठीराखा असे श्रीरंग
 
अस्तासही चंद्रभागा की निर्मळ सुवर्णधारा
ते थोडे मला मिळावे श्वासासही थोडा वारा
 
पर्वताशी अस्त जरीही नकळत आला कसाही
सारून रात्रीसही थोडे उजळेन चंद्र मी तसाही...


स्पर्श ..

आजूबाजूच्या सगळ्या मतलबी आणि पैशामागे लाळघोटेपणा करणाऱ्या जगाकडे बघितलं की अनंत प्रश्न मनात आ-वासून उभे रहातात. अशा वेळी माणूस पळून जायचाही विचार करतो कधी कधी पळतोही ! पण ते पळणे त्याला एकाच ठिकाणी खिळवून ठेवते हे मात्र त्याला समजत नाही. या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मनाकडे बरीच साधने असतात. त्यांना विरंगुळा असेही म्हणतात. पण माझी कविता हा नुसता विरंगुळा राहिलेला नसून तो माझाच एक अविभाज्य अंग होवून बसली आहे. तरीही ती वेगळी आहे, मनस्वी आहे आणि तिच्या या लिला बघत मन अगदी रमून जातं. आजवर झालेले बरेच घाव या कवितेच्या स्पर्शाने भरून निघतात .. अशी ही माझी कविता !

कविता ..
कविता म्हणजे एक कल्पना ..
जाणिवांना स्पर्शून जाणारी
भावनांच्या झुल्यावर स्वैर झुलणारी ..

संवेदना म्हणजे कवितेचा चेहरा
थकलेल्या मनाचा शब्दांचा आसरा ..

ती चालते
तशी तिच्या पायाखाली वाट उलगडत जाते ..
अक्षरांच्या चांदण्याखाली
ती जिवंत होते .. श्वास घेऊ लागते .. उमलत जाते

तिचा प्रवास असतो अगदी थोडासा ..
काही क्षणांचा ..
हा प्रवास संपला तरी ,
ते स्पर्श तसेच रहातात .. तिच्या पाउलखुणा जिवंत रहातात
तिने दिलेल्या जाणीवा बदलत नाहीत ..
बदलतात ते फक्त ऋतु..

कधी कधी संध्याकाळी
या पाउलखुणांना बधून येतो ..
मागे वळून बघतो ..
दूर .. गावाशेजारून नदी वहात असते
आणि मंदिरातला घंटारव दरवळत असतो ..

व्याख्या बदलल्या तरीही
तो स्पर्श अगदी तसाच असतो .. अगदी तसाच असतो !


त्यांची गोष्ट ..
संस्कृती आणि नीतीमत्तेचे कितीही बाळकडू पाजले तरीही आजही जग म्हणजे नर आणि मादी यांच्यामधला एकमेकांवर कुघोडी करण्याचा खेळ. प्रत्येकाला आपापल्या देहस्वीपणाचा एक गर्व असतो. हे सांगायचा कारण म्हणजे माझ्यासारख्याच सगळ्यांनी या गोष्टी बघितल्या, ऐकल्या असतील. मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेम म्हणजे दोघांनी एकमेकांशी तुल्यबळ युद्धानंतर केलेली संधी आहे. अशी संधी जिथे होत नाही तिथे कायम युध्द सुरु रहाते. मूक युध्द ज्याच्या शेवटी फक्त एकटेपण असते. यात चूक कुणाची हा प्रश्नच चुकीचा आहे.. असे हे तिचे आणि त्याचे एकटेपण मी बघितले आहे ज्यांच्यात आता संधी होणे नाही पण आता युध्द करणे ही अंगावर येत आहे !

तिने उधळल्या कळ्यांना
त्याने हळुवार झेलले ओंजळी
ती विसरून गेली कधीची
मात्र त्याने सजविली वेगळी

तो मागत नव्हता काही
होते तिचेही मृगजळी बाहू
तो सांगे पुन्हा स्वतःला
वेड्या .. स्वप्न हे नको तू पाहू

तिला भासले चंचल तिही
धरणीही जपे फुलाला
हरवून स्वतःला तोही
रानवारा होवून बसला

अशी जगावेगळी होती
ही 'त्याची' अमूर्त प्रीत
जसे दर्यावरती बनते
राखेत नवेले बेट

.. किती दिवस झाले त्याला ..

पण कोणत्याही संध्याकाळी पहा
ती खिडकीतून बाहेर बघत असते
आणि तो नदीकाठी उभा असतो .. एकटाच ..

मनाला एकटे वाटू लागले की एक नकळत सगळ्या व्याख्या रस्ते धूसर होवू लागतात. सारं काही अनिश्चित होवून जातं. एकट्या जीवाला कधीही जराही प्रकाश कमी झालेला आवडत नाही. अशा वेळी संधीप्रकाशावर चिडावं की रडावं हे त्याला काळात नाही सारं काही संदिग्ध होवून बसतं !

संदिग्ध
आभाळाचं तेज उतरू लागलं..
पाखरं परतू लागली ..
की कधी कधी 'ती' येते !
थोडी नदीकाठी रेंगाळते
थोडी पानांतून सळसळते
उंबऱ्याशी येऊन ठेचकाळते
खिडकीतून आत डोकावते ...

काय हवं असतं तिला ?
घराची चौकट ?!
देवघरातलं निरांजन ?!
झोपाळ्याशी खेळणारा वारा ?!
की ...
एकटेपण घालवण्यासाठी
एखादा अंधारा कोपरा !

ती आली की
घराच्या भिंती उचावू लागतात ..
काळोखू लागतात ,
आणि श्वासांचे स्तोत्र होवू लागतात
शब्द .. मोत्याच्या तुटलेल्या
माळेतून निसटू लागतात
सर्वत्र वीखरू लागतात !

तिच्या मनात नसेलही पाप
पण मी घाबरतो..
माझं पुण्य जपण्यासाठी
कारण ती येतेच
ती फक्त जाण्यासाठी
काही क्षणांच्या संदिग्धतेसाठी !


मेघांनो ..
या सगळ्या अनिश्चिततेचा अजून एक पैलू म्हणजे दाटून येणारे मेघ. हे मेघ बरसतही नाही आणि आकाश मोकळे ही करत नाहीत

मेघांनो .. आज पुन्हा आलात माझ्या दारी .. !

काय हवंय तुम्हाला ?
मनाजोगता आकार ?
अस्पष्ट क्षितिजाची किनार ?
की अनंताच्या प्रवासात ,
थोडा विसावा घेण्यासाठी आधार ?

तुमचे हे चालणे ..
कोणासाठी आहे ? कशासाठी आहे ?
आपलं सामर्थ्य आजमावण्यासाठी आहे !
की ,
नियतीने लादलेल्या कालचक्रासाठी आहे !

तुमचे धूसर बाहू ,
जेव्हा पृथ्वीला विळखा घालू लागतात ..
तेव्हा तिही थोडी गुदमरून जाते ,
वळणावळणांची माझी वाटही हरवून जाते ,
अस्तित्वाच्या पटलांना उकरून जाते..

माझ्या दारावर दाटून आलेले
मेघ आज मला घुसमटल्यासारखे वाटले !
कोणत्याही क्षणी त्यांना भरून येईल ...
आणि ते बरसू लागतील !

]]>
<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. २]]>Tue, 20 Sep 2011 16:43:59 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2408/1आई..
मला बरेचदा झोप न येण्याचा त्रास होतो ..आपल्या मनावर.. अगदी त्याच्या जन्मापासून एक अत्यंत तरल पण अविचल असं एक पटलं असतं ते म्हणजे आई. दुर्दैवाने ज्यांना आई नाही त्यांच्याही मनावर आईची एक निराळीच छबी असते. आईशी ताटातूट .. मग ती जागतिकीकरणाने असो नाहीतर दैवाने केलेली असो नेहमीच त्रासदायक असते. आई पासून दूर आलेल्या (अगर झालेल्या ! ) मुलाला झोप थोडी कमीच लागते. त्याला स्वप्नात त्याची आई ही फक्त त्याचीच आई न दिसता एक आदिमाया म्हणून दिसत असते.. तो तिच्याकडे जाऊ शकत नाही हे शल्य त्याला छळत असतं.. त्यामुळे त्याला सगळीकडे ती आई त्याला बोलावताना दिसते !

रोज सांजेचा स्वताला
खोलीत झाकून घेतो
अन आठवणींचा वारा
खिडकीत डोकवून जातो

तुझ्याच ज्योतीखाली
अंधार मला ग जपतो
रांगणारा बाळ तुझा
कोपऱ्यात गुडूप लपतो

दूर तुझे ग घरटे
सर्पासम लांब वाटा
श्वासात बालपणाचा
मज दंशतो ग काटा

विश्वाच्या बाजाराला
मी रोज मनाला विकतो
रक्तात गोठलेला
आक्रोश मात्र टिकतो

आसवांनी माझ्या जरी
ओंजळ भरली नाही
पण भिजली नाही अशी
पापणीही उरली नाही

आवेश पावसाचा
कौलांवर निनाद करतो
ओल्याशा भिंतीवरती
चेहरा एक उतरतो

रात्र उतरतानाही
होतात भिंतीही चिंब
चेहरा ओळखीचा
की माझेच ते प्रतिबिंब !

तो चेहरा मला विचारी 
तू झोपत का रे नाही ?
रात्री स्वप्नात माझ्या
बोलावते मज आई ..

स्थितप्रज्ञ, कर्मयोगी आणि नियती !
माणूस म्हटला की भावना आल्याच, भावना आली की स्नेह आला, स्नेह आला की क्रोध आला, क्रोध आला की मत्सर आला, मत्सर आला की प्रतिशोध आला, प्रतिशोध आला की पश्चाताप आला, पश्चाताप आला की अपराध भाव आला ... हे सत्र सुरूच रहात ! आपान आतापर्यंत दोन जीवन मूल्यांना श्रेष्ठ मानत आलेलो आहोत ती म्हणजे स्थितप्रज्ञता आणि कर्मयोग. या दोघांमुळे आयुष्य सफल होतं वगैरे वगैरे ... पण या सगळ्या तात्विक घोताल्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो ती म्हणजे नियती ! सुख आणि दुःख याना समान मानणारा स्थितप्रज्ञ आणि केवळ कर्म करण्यासाठी जन्माला आलेला कर्मयोगी म्हणजे "कृष्ण" .. कृष्ण तर भगवानाचा अवतार नव्हे साक्षात भगवानच ! पण तरीही नियती आहेच तरीही कृष्ण शापित झालाच ! 

खडकाच्या खोल कुशीत
रानफुलाने छोट्या
पसरून आपले बाहू
श्वासात गंध भरला

अभिमान होता फुलाला
पण हात जोडले होते
"अनंताचाच मी अंश"
नभाला थेट म्हणाला !

ऐकून फुलाचे उत्तर
क्रोध नभाला आला
जलस्तंभ दूत नभाचा
आवेशे धावुनी गेला

सहस्त्र वीजांनी तेव्हा 
नियतीचे घेऊन विष
प्रतीशोधाग्नी चेतवून
सावज अलगद धरला

धरणी होती निश्चल
मायेत अडकली होती
मातीच्या अंगावरती
वज्राचा प्रहार झाला

जखमी झाली धरणी
बाळे तिची बुडाली
फुलही वाहून गेले  ... अन
खडक एकटा उरला ..

स्थितप्रज्ञ कर्मयोगी
नियतीचे दोघे गुलाम
अवतार जन्मला तरीही 
शापित कृष्ण झाला !


ती होडी ..
नियतीवर कुणाचा अंकुश नसतो हे खरेच आहे. पण म्हणून नियतीने एखाद्या राक्षसासारखे आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत सुटावे असे नाही. नियतीने अंत केलेल्या अनेक जीवांना मी बघितले आहे. त्यांपैकी अनेक जीव हे महात्मे नसले तरीही वाईटही नव्हते. असा कुठल्या चांगल्या जीवाचा वा त्याच्या स्वप्नाचा अंत झालेला बघितलं की नियती अक्राळ विक्राळ हसताना मला दिसते. तेव्हा तिचा फार राग येतो. तेव्हा नियती रक्तपिपासू भयानक दैत्यासारखी दिसते. पण एखाद्या जीवाला साखळीने बांधून त्याची पोहोच जिथे संपते त्यापासून अगदी जवळ , जिथून तो जीव सहज पाहू शकतो अशा अंतरावर त्याचे स्वप्न ठेऊन गम्मत बघत बसणे हा नियतीचा खेळ त्या स्वप्नाच्या आणि जीवाच्या हत्येपेक्षाही क्रूर !

हेलकावे खात होती
ती
किनारा पहात होती

तिचे पाय जखडले
साखळ्यांनी तळाशी
विरहाची गाठ बसली
तिच्या मुक्त मनाशी
पुढे येत नव्हती
ना मागे जात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती

लाटा धडकल्या तिला
शरीराचे तुकडे उडले
अश्रुंचे थेंब तिचे
खाऱ्या पाण्यात पडले
त्याची एक लकेर
दूरवर वहात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती

तिच्या शिडाच्या पदरी
ठीगळांचे जाळे होते
बाहुंच्या वल्हवांचे
तळवेही काळे होते
आठवण म्हणून उरली
वाळू उरात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती

तुटल्या फुटल्यांनाही
सापडले थेट किनारे
अजाण भरकटल्यांना
साथीला होते वारे
तिची एकटी हाक
कानावर येत होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती

किनारा होता निश्चल ती पसरून हात होती
ती ... हेलकावे खात होती !


"अश्वत्थामा"
'जैसी करनी वैसी भरनी' हे खरच आहे. पण माणसाला कधी कधी अशा शाप मिळतो की लोकं त्यासाठी सगळा आटापिटा करत असतात. त्या गोष्टीला शाप बनवते माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती. ज्या अमरात्वासाठी अनंत देव दानव माणसं यांनी आयुष्य घालवलं तेच अमरत्व अश्वत्थामाला शाप म्हणून मिळालं ! अश्वत्थामा आता कदाचित त्याच्या या आयुष्याला कंटाळला असेल... या शापातून मुक्त होणं म्हणजे मरण मागणे ! जर मरण हीच त्याच्या जगण्याची आशा झाली असेल तर ?!

दाही दिशांचा निर्वंश 
गळ्याला फास आता
मागून घेतो भुकेल्या
घारींचे भास आता 

वितळू दे प्रतिमा आता
तोडून टाका दर्पणे
अस्वस्थ मजला भासे
मलाच माझे हसणे

उघडून टाका खिडक्या
अंधार दाटला आहे
भिंतीवर सावल्यांचा 
श्वास कोंडला आहे

संध्येच्या पैलतीराला
रात्रीची गर्द किनार
मी होतो चकोर, गगनी 
मेघांची क्रूर मिनार

रक्ताच्या थेंबात माझ्या 
अंश येतो मत्सरी
सर्वनाश दिसता कसा तू   
हातात घेतो बासरी

ती फुंकर मला तू दे रे
हुंकार मिळू दे त्याचा
ज्योत उरली एक
तू प्राण राख समईचा

अमरत्व नको मज आता
नको दिव्य तो मणीही
युद्धात "अश्वत्थामा"
आता न हो कुणीही

वादळं दोषी नसतात..
हेही एक मोठं सत्य आहे की दुःख प्रत्येकालाच असते मग तो अमर असो वा नसो. पण गमतीचा भाग असा की मनाला या दुःखाच एव्हढं दुःख नसतं जेव्हढं दुःख त्याला या कल्पनेने होतं की त्या दुःखाचं खापर तो कुणाच्या माथ्यावर फोडू शकत नाही. पण हेही खरं आहे की की आपण जे करतो बरेचदा आपल्याला हवं म्हणून करतो अशा वेळी दुसऱ्याला दोष कसा देता येईल बरं ?! अशा दुःखांच्या वेळी मी स्वतःलाच समजावून देतो की आपण लावलेली फुलं आपणच जपायची असतात !

तुकडे काही उचलताना
अश्रुंना मोजत होतो
जखमांना वेदनांना
तुझेच नाव देत होतो

विसरून गेलो होतो
स्वप्न माझेच होते
चित्र होते तुझे पण
हात माझेच होते

एक मात्र कळालं आज
वादळं दोषी नसतात
आपली फुलं आपणच
सांभाळायची असतात !ऋतू
तरीही माणसाचं मन विचित्र आहे. दोष स्वतःला देता येत नाही आणि दुसऱ्याला दिला तर बरं दिसत नाही ! याचं फळ म्हणजे प्रश्न अनंत प्रश्न न सुटणारे प्रश्न, कोंडी करणारे प्रश्न, दाटून येणारे प्रश्न ... हे प्रश्न कोणा कोणाला धाडस देतात कोणी यांचा उपयोग प्रेरणा म्हणून करतो पण मला न सुटणारे प्रश्न स्तिमित करतात. स्तब्ध करतात विचार करायला लावतात. आणि मग मी या प्रश्नांचा विचार करायला लागतो. प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही मी त्यांचा विचार करतो हेही खरं ! अशा वेळी काळ जरासा थांबल्या सारखा वाटतो असं वाटतं की जग गतिमान आहे आणि मी एकाच जागी उभा आहे. मग त्याचाही मनाला प्रश्न पडतो की सगळं जग बदलतंय पण काही गोष्टी तशाच आहेत त्यांच्यात बदल होत नाहिये  ...

ऋतू येतात आणि जातात
दिवस रात्र ही थांबत नाहीत
काही गोष्टी मात्र कधीच बदलत नाहीत
मी आणि माझे आठवणींचे विश्व

वाटा आहेत काहीशा नागमोडी
सावली आहे कधी धूळ थोडी
वळणांवर न सुटल्या प्रश्नांची कोडी

मनाची शाई अन मौनाची उत्तरे ..

वर्षातून एकदा येणारा हा दिवस..
ऋतूमानाप्रमाणे परत परत येणारी गोष्ट म्हणजे वाढदिवस. जगाचं कालचक्र जरी एक जानेवारी ला सुरु आणि संपत असलं तरी प्रत्येकाचं आपापलं कालचक्र या वाढदिवसाला संपतं. हा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी खरं तर हिशोब मांडायचा दिवस असतो. भरपूर हिशोब, जुळवाजुळव, गोळाबेरीज केल्यानंतर मला असं फार वाटतं की नको ही गोळाबेरीज .. आपलं आयुष्य मुक्तपणे जगावं असं कुणाला वाटणार नाही ? मलाही तसाच वाटतं आणि काही क्षणांसाठी का होईना मी हिशोब सोडून .. त्याने दिलेल्या या आयुष्याचा आनंद मी घेतो .. अर्थात भित्र्या मनाला थोडा पटवून द्यावं लागतं !

तीनशे पासष्ठ दिवस झाले
की एका डायरीचे पान पलटायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?

टेबलावरचा कचरा
कधी कमी झाला कधी वाढला
आईने कटकट केली
अन माळावरचा गठ्ठा काढला
वेळेशी चुकलेल्या गणिताचे
वेळापत्रक तेव्हढे फाडायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?

स्वप्ने लोभस काही
संकल्पही मी सोडला होता
गुलाबही दिसतो कधी 
मी पुस्तकात लपवला होता
पानापानावर त्याच्या
एकच चित्र नांदायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?

पण ..

तुटल्या फुटल्यांवर का
चर्चा करत बसायचे ?
रस्ता निवडला मी
त्यावरच चालत जायचे ?
प्रेम वाटंत फिरायचे
प्रेम वेचत हिंडायचे 
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?

ढग आले तरीही
पल्याड सूर्य माझा
क्षितिजावर धुंद
रंगीत पंख माझा
त्याने दिलेले शब्द
त्याने दिलेले गाणे
आपण फक्त गात जायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?

लाईफची पानं साला..
ही सगळी चक्र पाहिली की मनाला पडलेला प्रश्न म्हणजे हे नक्की कोन ठरवतं ? आमच्या या छोट्याशा आयुष्याच्या छोट्याशा पुस्तकात हे कोणी छापून ठेवलंय ? हा जो कोणी आहे त्याला खरं तर मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. कैक गोष्टी अशा आहेत ज्यांचा माझ्या आयुष्याशी संबंध अजून तरी माझ्या लक्षात आलेला नाहीये ! विशेषतः इंजिनियरिंग वगैरे करणाऱ्या मुलांना तर भलतेच लोकं भेटतात. आयुष्यात घडणाऱ्या घटना म्हणजे क्षणोक्षणी चालू असलेली परीक्षा वाटत रहाते. तुम्हाला कुणाला जर हा कोन आहे तो भेटला तर मला सांगा प्लीज !!

स्वप्नांच्या दाराला का अंधाराचे टाळे
चकव्या फसव्यांचे साले नशिबाचे चाळे
जिंकणाऱ्यांचा रस्ता सोपा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?

फुललेल्या झाडांवर माकडांच्या रांगा
आपलाच घोडा आणि आपलाच टांगा
फाटक्यांचा रोमियो हा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?

व्हाईट कॉलर म्हणून कधी बंड नाही केला
तरी लोक म्हणतात कसा पोरगा वाया गेला
दिव्याखाली बसून मोठा होतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?

नेता असतो कोणी आणि कोणी हिटलर
कोणी होतो पोलीस आणि कोणी प्रोफेसर
यांच्या जाळ्यात साला फेकतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?

]]>
<![CDATA[मनपटलांवरच्या रेषा.. २]]>Tue, 06 Sep 2011 21:38:11 GMThttp://rhtbapat.weebly.com/2350234423462335235423662306235723522330238123512366-2352237523592366-2408/first-postझाड प्राजक्ताचे !
मनाची अजून एक मोठी खोड म्हणजे स्वतःच स्वतःशी  खेळत बसायचं. हे खेळ अगदी लपाछापी सारख्या सामान्य खेळापासून प्रेमाच्या किचकट क्लिष्ट खेळांसारखे असू शकतात. प्रत्येक खेळाचे पडघम एकेका पटलावर आपला रंग सोडून जातो. त्यात अगदी प्रत्येक डावात किती भिडू चकले, कुणावर राज्य आले कुणी रडीचा डाव खेळला आणि माघार घेतली या सगळ्यांचं वर्णन असतं. मनाला शांत बसवत नाही ! पटलांवर ओढलेल्या रेषांवर चालता चालता रंगत जाणारा त्याचा अजून एक खेळ म्हणजे आठवणींच्या वर्तमानाशी जोड्या लावत बसणे. या खेळात त्याला कधी काय आठवेल याचा नेम नाही. माझ्या शहरातल्या घरात अशीच एकदा एक जोडी जुळवताना आमच्या वाड्याची आठवण आली. त्याच्या अंगणात एक प्राजक्ताचं झाड होतं ...

Picture
अंगणात आजीने माझ्या
लावले होते झाड प्राजक्ताचे

वृंदावन होते एक ,चौकात रंगवलेले
राधा कृष्णाला ,त्यावर गोंदवलेले

खुंटीवर असायची ,काळी छत्री बाबांची
आणि खोलीत पोथी माझ्या आजोबांची

रेंगाळलेले जीव ,काही पायरीवरती
वाळणाची आरास ,अशी कौलांवरती

आंब्याचा मोहोर ,सुकला ना कधी
कोकीळ दारचा ,मुकला ना कधी

गायी जायच्या ,पैलावर एकट्या
दिवस रात्रींचे ,सत्र तसे लीलया

रात्री चालती ,गोष्टी सुःख दुखांच्या
हलकेच येई ,चादरी चांदण्याच्या

रोज पडतसे ,प्राजक्ताचा सडा
स्वप्नातला गाव ,स्वप्नातला वाडा

सकाळी स्वप्न विरघळावे जसे
चक्र काळाचे फिरले जोराने तसे

आता उरले दगडांचे ढीग काही
कुंपण काटेरी बाभळाचे
अन जुनाट सुरकुतलेले
अंगणातले झाड प्राजक्ताचे !


' तिचा ' गुण
मन मनमानी करतं खरं , पण दर वेळेला त्याचे लाड पुरवले जातीलच याची हमी देता येत नाही. लाडीगोडी करण्यात तर मनाचा हात कोणी धरूच शकत नाही. लाडीगोडी करणाऱ्या प्रेयसीच्या मागण्या जशा थोड्या अल्लड थोड्या पोरकट आणि तितक्याच नाजूक असतात तशाच काहीशा मागण्या तरंगासारख्या उठणाऱ्या कवितेच्याही असतात. पण त्या कितीही बाळबोध वाटल्या तरी अगदी हव्या हव्याशा वाटतात. एकदा प्रेम म्हटलं की मनाचं रुसणं फुगण हसणं रागावणं आणि हळूच लाजणं हे ओघाने आलंच ! हळू हळू माझी कविता माझ्या मनाला प्रेमाच्या हक्क आणि हट्ट या दोन बाजूंनी जवळ घेतं. तेव्हा मनाला कविता आणि ' ती ' च्यात साम्य वाटू लागतं !

कधी सुंदर मोहक रसरसलेली
कधी चिडकी हट्टी आणि रुसलेली

क्षणात अशी क्षणात तशी
तू सांग मला तू आहेस कशी
नभांगणातून अवतरणारी
वीज धरणीला मिळे जशी

रानफुलाचे सुगंध तुझे
मनामानाचे बंध तुझे
हसणे तुझे रडणे तुझे कधी कठोर अबोले तुझे
दवबीन्दूंत नाहलेले उजळ रूप कोवळे तुझे

पैल तू पैलतीर तू
सांजवेळी गाऊन केव्हा
मला फसवण्या माहीर तू

नटणे तुझे मुरडणे तुझे
नवीन नूतन नखरे तुझे
फुलानाही लाज वाटावे
असे ग ओठ हसरे तुझे 

कधी होतेस हास्यवेल
कधी होतेस गर्द कहाणी
एकटीच तेवणारी समई
कधी सुरांची होतेस राणी

हे आपले अबोल नाते
स्वर्गात घडवले आहे
म्हणूनच प्रेमाचे सारे अर्थ
विरहात दडवले आहे

आता ना एकटा मी
ना एकटी राहशील तू
शब्दात तुझ्या अडकलेल्या
मलाच पाहशील तू

या ' गूढ ' वागण्याचा ' अर्थ ' मला कधीचा कळून बसलाय
माझ्या कवितेलाही बहुदा ' तिचा ' गुण लागलाय !कसं ?
आयुष्याची वाट ही नागमोडी नसली तरच विशेष .. पण मनाच्या पटलांवर ज्याने या रेषा ओढलेल्या आहेत त्या मात्र या वाटांहून अधिक नागमोडी आणि विस्मयकारी ! आयुष्य प्रश्न विचारतं , कधी कधी त्यांची उत्तरं ही सापडतात. मनाला पडणारे प्रश्न म्हणजे या रेषांच्या कडेने ओघाने वाढलेले वृक्षच ... त्यांच्या अस्तित्वाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्या सावलीत बसणं हेच योग्य. काही प्रश्न तर असे की त्या प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं .. किंवा कदाचित नसतंही. तेव्हा मी या प्रश्नोत्तरात अडकण्यापेक्षा एका प्रवाशासारखा थोडा वेळ सावलीत विसावा घेतो पुन्हा या रेषांवर चालण्यासाठी
कसे जन्मते, फुल ते
गर्भात या कळीच्या ?
कसा भ्रमर तो, झोपतो
ओच्यात पाकळीच्या ?

कसे बोलते, बाळ ते
बोबडे बालगीत ?
कसे नांदते, मुग्ध ते
संगीत बासरीत ?

कसा चंद्र तो, बांधतो
बंध तारांगणाशी ?
कसे सापडे, ते सडे
जाईचे अंगणाशी ?

कसे शोधतो, पक्षी तो
ते घरटे सांजवेळी ?
कसा सांडतो, जलधर तो
पाउस कोण्या अवेळी ?

कसा सांगतो, मोर तो
नाते मल्हाराशी ?
कसे वाहतो, सूर्य तो
किरणांच्या अमृतराशी?

कसे विहरते, मन ते
कल्पनांच्या दूर गावी ?
कशी रात्रही, आजही
स्वप्नांनी चिंब व्हावी ?

श्रावणवेडी
या माझ्या छोट्याशा भावविश्वात माझ्या मनाने एक आपलंच निराळं विश्व उभं केलंय. त्याच्या स्मृती पटलांमध्ये त्याने स्वतःच निर्माण केलेली काही पात्र आहेत , काही सावल्या आहेत. त्यांचं बाहेरच्या जगातल्या अस्तित्वाशी संबंध असेलच असं काही सांगता येत नाही. खरं तर प्रत्येक मनात एक छोटीशी परी लपलेली असते. तिचं बाहेरच्या जगात अस्तित्व असो वा नसो मन तिच्यावर प्रेम करत असतं. तिची नानाविध रूपं मनाला मोहून टाकत असतात. तेव्हा ताठ मानेने मन सांगतं "होय माझीही एक प्रेयसी आहे ". सगळ्यांच्या मनातल्या प्रेयसीप्रमाणे माझीही प्रेयसी मनाच्या अनेक पटलांची ओढणी पांघरून आहे. तिचे येणे म्हणजेच वसंत होवून जातो आणि कधी तर चक्क सकाळी सकाळी ती एक श्रावणवेडी बनून येते ..

Picture
जाग आली पंखांना अन
जागा झाला दिनकरही
फुंकर घाली वाराही अन
जागा झाला जलधरही

कोवळ्या चोचींचे कोवळे
पहिले किलबिल गाणे
अंगणात परसात
फुलपाखराचे येणे जाणे

पातींच्या ओंजळीतला
पाउस अजून कालचा
त्यात खेळ अवतरे
बिलंदर इंद्रधनुचा

वेलीच्या कुंद तनुवर
शृंगार कळ्यांचे आगळे
बिलगलेले फांदीवरती
अल्लड पारवे जांभळे

गुलाबी आसमंत थोडा
किरणांची मौज थोडी
गालात लाजून आली
ती अवखळ श्रावणवेडी..

मनात बहरून आली
ती अवखळ श्रावणवेडी..


"यशोदा"
मनाला देवपण नको असतं. मनाला माणसं हवी असतात. मनाला त्याची हक्काची माणसं हवी असतात, त्याची वाट बघणारी, थोडी भांडणारी, रागावणारी, लाड करणारी.
आपलं आयुष्य कसं असावं ? हा प्रश्न जर कुणी मनाला विचारला तर मन काय उत्तरं देतं सांगू ? कृष्णासारख ! देवपण मिळो न मिळो प्रत्येकाला आपलं लहानपण कृष्णासारख असावं असंच वाटतं. कुणाला तरी आपल्या बाल लीलांनी फसवून त्याची गम्मत बघायला मिळायला हवी होती असं वाटतं. कृष्णाचं आयुष्य खरं तर एका अवताराच आयुष्य आहे. पण मला आवडतं ते त्याचं लहानपण.. त्याच्या त्या लीला, त्याचे खेळ, सवंगडी, बासरी आणि त्याच्यावर सगळी पृथ्वी ओवाळून टाकणारी 'यशोदा'

Picture
आज पुन्हा पैलतीरी
ती होती हिरमुसलेली ,
कान्हा दिसेना तिजला
की नकळत सांज झाली

मन होते आसुसलेले
फुटला न आज पान्हा
उदास वासरासाठी
ही गाय गोठ्यामधली
कान्हा दिसेना ...

हात तिचा आज रिता
दहीभात सांडलेला
पिलू नाही घरट्यामध्ये
पक्षिणी घास घेऊन आली
कान्हा दिसेना ...

रक्ताची नाती खोटी सारी
मन तिचे सांगते आता
जन्म दिला नसेल जरी 
पण आई जन्मास आली 
कान्हा दिसेना ...

व्याकूळ झाली आज
की भगवंत दूर जावा
अन उष्ण झालेली पृथ्वी
डोळ्यात तिच्या  उमटली
कान्हा दिसेना ...माझा दीपस्तंभ !
पण .. हे सगळं स्वप्नातलं चांदण झालं की असं असतं तर काय आणि तसं असतं तर काय ?! एकदा डोळे उघडलेकी पुन्हा स्वप्नाहुन निराळं जग वास्तव बनून आ वासून उभं असतं. कधी आवडीने कधी निरुपायाने आयुष्याच्या रहाटगाड्यात स्वतःला झोकून द्यावं लागतं. जीवनाचे, समाजाचे नियम आणि अटी आपल्याला कळतात, या चौकटीची आपल्याला जाणीव असते. पण या मनाला कोण समजावणार. अशा वेळी मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं. हट्ट धरून बसतं. तेव्हा मात्र मी कासाविस होऊन जातो .. स्वतःपासून दूर पळून जायचा प्रयत्न करतो.. पण मन नसलं की सारं जग भयान वाटू लागतं. मग मी पुन्हा मनाच्या ओढीने मागे फिरतो अगदी खूप प्रयत्न करतो. मला वाटतं की मन अजूनही रागावलेलच असेल ... पण ते मात्र एका दीपस्तम्भासारखं किनारी उभं असतं .. मला दिशा दाखवत .. माझी वाट बघत !

कोण्या गर्द वेळी नाव माझी
घेऊन मी समुद्रात रे शिरलो
उघडून शिडाचे पंख उर्मीने
चौफेर दिशांना मी रे फिरलो

आज वादळाची होती चाहूल
विचारांचा आज कल्लोळ होता
भीतीच्या तरंगावर मातला
फसव्या धुळीचा लोळ होता

अथांग चंचल गहिरे पाणी
चंद्र मनाचा उमटला त्यात
रक्त पिपासू एक दैत्य मग
प्रतिबिंबात प्रकटला त्यात

निघालो होतो असा मात्र मी
माझ्याहून दूर देश जाया
आता शोधत होतो स्वतः ला
सावलीत मनाच्या निजाया

आता माझ्याचसाठी मनाची
पुसटशी किनार उरली
मन होता उभं दीपस्तंभापरी
मी किरणांनी ओंजळ भरली !

चिकटपट्ट्या !
मनाची काही पटलं जरा दूर केली की समोर येतं मनाची स्वतःवरच प्रेम करण्याची प्रवृत्ती. स्वाभिमान तसा जड शब्द असला तरी तो प्रत्येक मनात असतो. मला बरेचदा प्रश्न पडतो की या प्रेमाखातर या स्वाभिमानाखातर कोणी कोणाची मदतच नाकारत असेल तर ? तेव्हा मन तडजोड करायला लागतं, शिकतं. तेव्हा ते मन सगळे तुकडे जोडायचा प्रयत्न करतं. मनाला याचंच समाधान मिळत रहात की ते स्वतंत्र आहे , त्याला कोणाचं मिंध नाही. या सगळ्याची परिसीमा म्हणजे त्याला याचा अंदाजच रहात नाही आणि एकदा कधीतरी जेव्हा तो स्वतःकडे मागे वळून बघतो तेव्हा फक्त जोडून जोडून केलेला संसार दिसतो ... तुकडे तुकडे जोडलेलं स्वतःचच मन दिसायला लागतं.

Picture
आधी त्याने चिकटपट्टीने
खिडकीच्या तुटलेल्या काचा जोडल्या

नंतर खिडकी शेजारच्या
खुर्चीचे पाय चिकटपट्टीने जोडले

फाटके वेळापत्रक त्याने
भिंतीवर चिकटपट्टीने चिकटवले

जुन्या घड्याळाचे काटे
मुश्किलीने चिकटपट्टीने अडकवले

लाकडी हत्तीची तुटलेली सोंड
चिकटपट्टीने योग्य जागी बसवली

दुभंगलेल्या पेनाचे तुकडे
चिकटपट्टीने पुन्हा एकत्र केले

आजूबाजूच्या लोकांची तोंडे
चिकटपट्टीने बंद करावीशीही त्याला वाटलं

जे जे काही तुटले फुटले होते
सगळं चिकटपट्टीने जोडून टाकलं

त्याला प्रश्न पडला तुकडे तुकडे
झालेलं आभाळ चिकटपट्टीने जोडता आले तर ?..

याच विचारात तो बाहेर आला
अचानक घराकडे वळून पाहिलं तर
घराला फक्त चिकटपट्ट्या .. चिकटपट्ट्या .. आणि चिकटपट्ट्या !

दोष
काही घटना अशा असतात की तेव्हा मन स्वतःलाच सहानुभूती देतं की तुटक फुटक का होईना पण देवाने आपल्या पदरात आयुष्य दिलेलं आहे. या आयुष्यात जोडून जोडून केलेलं का होईना एक संसार असतो, एक कुटुंब असतं. मुठीत मावेल एवढ एक घर असतं. घरात ठिगळ लावलेली का असेना पण मायेची एक चादर असते, दहा ठिकाणी गाठी मारून मारून लांब केलेला एक प्रेमाचा धागा असतो. काहींना थोडं कमी मिळतं काहींना थोडं जास्त ... ज्यांना यातलं काहीच मिळत नाही त्यांच काय ? काही जीवांना जन्मच लाभात नाही त्यांच काय? त्यांच्या इवल्याशा मनाने रंगवलेल्या इवल्याशा विश्वाच काय ? त्यांच्या स्वप्नांच काय ? अशा वेळी कोणाला दोष देणार देवाला ? नशीबाला ? गतजन्मीच्या पापांना ? की साक्षात जन्मदात्या आईला ? अशाच एका फुलाबद्दल मनाच्या एका पटलावर प्रश्नांचे डाग पडलेत ज्याला गर्भात असतानाच देवाने परत बोलावून घेतलं...

उमलत्या फुलांना खुडतात कोणी
पाकळ्यांना त्या तोडतात कोणी ,
वाहून नेले वादळाने कळीला
त्याला दोष कोण द्यावा ?

देवाचे वागणे अन्यायीच असते
एखादीच घागर भरलेली असते ,
पुरात वाहून जातात काही
त्याला दोष कोण द्यावा ?

जगतात पांगळे इथे जीव थोडे
प्रारब्धात बुडतात सगळे थोडे ,
दिसलाच नाही सूर्य काहींना
त्याला दोष कोण द्यावा ?

दिवसाची करून रात्र तिने
ज्योत आणली तुझ्या घरची ,
ती गर्भात मालवून जावी 
त्याला दोष कोण द्यावा?

मला काय करायचंय ?
काही काही प्रश्नांना खरच माणसाकडे उत्तर नसतं. पण स्वतःवर अतोनात प्रेम करणारं मन देखील कधी कधी कुपमंडूक वृत्तीचं बनून जातं. अशा वेळी उत्तरं असून देखील ती सांगण्याची तयारी न दाखवणे किंवा उत्तरं शोधण्याचेही कष्ट न घेणे ही त्या मनाची आणि बहुतेक मने स्वतःवर खूप जास्त प्रेम करणारी असल्या कारणाने पर्यायाने समाजाची प्रवृत्ती बनून जाते. मी त्याला स्वार्थ म्हणत नाही कारण स्वार्थ ही पूर्ण जाणून बुजून अंगीकारण्याची वस्तू आहे, आजकालची 'मला काय करायचंय ?' विचारणारी मने हे कुपमंडूक वृत्तीचे बळी. दुसऱ्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायची ताकद असूनही केवळ आजूबाजूला डोळे उघडून न बघणारे कधी कधी स्वतःच अशा प्रश्नात अडकतात तेव्हा त्यांनाही हेच उत्तर मिळतं ... 'मला काय करायचंय ?'

तीच सकाळ , तोच रस्ता
कालच इथे एक मोर्चा झाला होता ,
यातच एका खड्यात पाय अडकून
एक माणूस पडला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!

तेच वर्तमानपत्र ,तीच
येऊन ठेपलेली आणीबाणी होती
थोडी महिलांची 
थोडी वृद्धांची रडगाणी होती
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!

पुन्हा कचेरीत जायचं होत
कामगारांचा संप झाला होता ,
मी परत घरी निघालो
माझा पगार तर झाला होता !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!

पुन्हा तीच चर्चा
खर कोण आणि कोण खोट ?
की त्या नेत्यांच आणि
संघटनांच साटलोट !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!

तीच वाटेतली झोपडपट्टी
मवाल्यांनी चौक भरला होता
तिथेच एका गाडी शेजारी
एका पोराने कटोरा धरला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!

दुर्लक्ष केल , खुश होतो , की
मी या सगळ्यातून सुटलो ,
आणि त्याच रस्त्यात
खड्यात पाय अडकून पडलो 
मला आवाज आला , " मला काय करायचंय ?! "

एका अश्वाचे मनोगत !
नाईलाज .. मनाची अनेक पटले या नाईलाजामुळे दबलेली असतात, हिरमुसलेली असतात. ही पटले म्हणजे दगडासारखी कठोर, काट्यासारखी बोचरी आणि उदासीनतेच्या विषाने थबथबलेली असतात. आजूबाजूच्या घटनांना काही इलाज नसेल तेव्हा खोल खोल ठेवलेली ही पटले कोणीतरी उकलून काढतंय असं वाटतं. परिस्थितीला उत्तरं नसेल तर एक वेळ नाइलाजाचा अर्थ समजतो पण जर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना उत्तरं असतील किंवा घडून गेलेल्या घटनांना कोणी जबाबदार असेल तर, नाईलाजानेच त्या गोष्टी कराव्या लागल्या असतील तर मन अगदी विषण्ण होऊन जाते. मी कधी कधी कल्पना करतो की महाभारत जेव्हा घडून गेलं असेल तेव्हा कुरुक्षेत्रावर बसून आणि आजूबाजूचा सर्वनाश बघून कृष्णाला काय वाटत असेल ? त्याला त्रयस्थपणे बघणाऱ्या त्याच्या रथाच्या अश्वाला काय वाटलं असेल ?

जे चक्र भगवंताने आणिले मागे
कर्म धर्म माणसाचे जाहले जागे

धावलो पुढे मी उधळून चौफेर
कर्मयुगाचा एका कराया अखेर

रक्त पिण्या सज्ज झाले उर शरांचे
बघता बघता झाडले प्राण ते करांचे

उन्मळले धर्म वादळात ते वृक्ष
काळसर्पाने केले माणसांना भक्ष

मी धावलो भयाने आसुडतालावरी
हाकतो आवेशे तो सारथी चक्रधारी

कैक दिवसांचे गळाले अणू रेणू
चित्कारले त्वेषाने शन्खातले वेणू

घायाळ पृथ्वीचे रक्त तुडवीत होतो 
भंगलेले अंग प्राणांचे उडवीत होतो

लागला बाण मलाही, झाला घाव एक
अमृत झरे जखमांतून हीच त्याची मेख

कोण्या सांजवेळी थांबला बेभान वारा
समोर अभंग अंत , जीवनाचा पसारा

धर्माच्या रक्षणाला मृत्यूचे मांडले तांडव
द्रौपदीच्या चिंधीसाठी विजयी झाले पांडव

पृथ्वीच्या कोपऱ्यात झेंडा फडकत होता
एकटा भगवंत तो गंगाजल पाजत होता

आहे नशीबवंत की सत्याचा वाहक
धर्म तरो कर्म तरो
तरो कुणाच्या प्रतिज्ञा
सत्यसूर्याचे आशीर्वाद मात्र दाहक !
]]>